CET EXAM DATES : सीईटी परीक्षांच्या तारखा जाहीर, 31 मार्चपर्यंत करता येणार अर्ज

पुणे : येत्या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षेसाठी (CET exam) विविध अभ्यासक्रमांची नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलमार्फत (CET cell) सुरू आहे. तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेच्या (सीईटी) तारखा जाहीर झाल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता राज्य सीईटी कक्षामार्फत उच्च शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 03 जून ते 10 जून, 2022 यादरम्यान घेण्यात येणार आहेत. तंत्र शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक 11 जून ते 28 जून 2022 यादरम्यान होणार आहेत. तसेच कला शिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा दिनांक12 जून, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत. अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका, वेळापत्रक/बदल आणि अभ्यासक्रम सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
यासोबतच अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षांची माहिती पुस्तिका वेळापत्रक व परीक्षेत बदल झाल्यास त्याची माहिती संबंधित वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. सध्या सीईटी सेलकडून या परीक्षासाठी नोंदणी सुरू आहे. तिन्ही विभागांचे मिळून आतापर्यंत एकूण 4 लाख 58 हजार 721 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर यापैकी 3 लाख 70 हजार 304 विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले आहेत. उर्वरीत 88 हजार विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. दरम्यान अर्ज भरताना विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येत आहेत, त्याचे निराकरण सीईटी सेलकडून करण्यात येत आहे.
सध्या कोरोनाची लाट ओसरली आहे. कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होत आहे. मात्र तरी देखील प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत आहे. या सर्व परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम काटेकोरपणे पाळूनच घेतल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सूचना देण्यात येणार आहेत.




