महागाईत भर : राज्यात वीज दरवाढ अटळ; जाणून घ्या किती होणार महाग

पुणे : कोळशावर आधारित वीज खूप महागली असून त्यापोटी वीज वितरण कंपन्यांनी राखीव ठेवलेला निधी (इंधन समायोजन निधी) डिसेंबर महिन्यातच संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता राज्यात वीज दरवाढ अटळ आहे. यासंबंधी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वितरण कंपन्यांना नव्या सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांनुसार ही दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे.
वितरण कंपन्या वीजनिर्मिती प्रकल्पांकडून वीजखरेदी करून ती ग्राहकांना विक्री करतात. वीजनिर्मिती कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला की ते वितरण कंपन्यांना महागड्या दराने वीज विक्री करतात. या स्थितीत वितरण कंपन्याही ग्राहकांकडून ‘इंधन समायोजन आकार’ म्हणून अतिरिक्त दैराने वीजविक्री करतात. अशा या महागड्या विजेचा ग्राहकांवर ताण येऊ नये यासाठी वितरण कंपन्या निधी राखीव ठेवतात. परंतु मागील जवळपास वर्षभरात प्रामुख्याने कोळशावर आधारित वीज प्रचंड महागली. परिणामी वितरण कंपन्यांचा हा ‘इंधन समायोजन निधी’ आता संपला आहे. यासंबंधीच आयोगाने नवीन सूचना दिल्या आहेत.
आयोगाच्या या नव्या सूचनांनुसार एप्रिल महिन्यात तरी दरवाढ होणार नाही. परंतु महावितरणचा हा निधी डिसेंबर महिन्यातच संपुष्टात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व वीज ग्राहकांची वीज मे ते जुलैदरम्यान कधीही महाग होऊ शकते. ही वीज दरवाढ अटळ असल्याचे चित्र आहे. महावितरणची ही वाढ दीड रुपये असू शकते.




