राजकीय

झुकेगा नहीं, मला अनेक पक्षांच्या ऑफर : वसंत मोरे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार नाही. पक्षाचा कार्यकर्ता आहे. पक्षातच राहीन, मी मनसेतच राहणार आहे, अशी भूमिका मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्यावर मांडली आहे. तर रुपाली पाटील यांनी ‘मी मनसेतून राष्ट्रवादीत येताना तुम्ही म्हणाला होतात, तुझी राजकीय आत्महत्या असेल, पण वसंत भाऊ आता तुमची पक्षाने तर हत्या केली की…..!’ , असं म्हणत रुपाली पाटलांनी मोरे यांना डिवचलं आहे. तसंच बहिण म्हणून तुमच्या पाठीमागे नेहमीच उभी असेल, असंही म्हटलं आहे.

 “मी माझी भूमिका बदलणार नाही. भोंग्यांसंदर्भात आधी जी भूमिका मी घेतली होती, तीच माझी आताही भूमिका आहे. मी झुकणार नाही, माझी भूमिका बदलणार नाही. शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्हाला लोकांना तोंड द्यावं लागतं”, अशा स्पष्ट शब्दात वसंत मोरे यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा जोरकसपणे मांडली आहे. वसंत मोरेंनीही पक्षाचा आदेश मान्य करत साईनाथ बाबर यांचं मोठ्या मनाने अभिनंदन केलं. पण पक्षाचा आदेश मान्य करताना आपल्या भूमिकेवरुन आपण तसूभरही मागे हटलो नाही, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

“मी माझी भूमिका बदलणार नाही. मी लोकप्रतिनिधी आहे. शेवटी प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटतं की आपल्या वॉर्डात, प्रभातात सलोखा राहावा. आपला भाग शांत राहावा. तसं मलाही वाटतं. मग मी चुकलो कुठे?”, असा सवाल यानिमित्ताने वसंत मोरे यांनी विचारला.

“माझी हकालपट्टी झालेली नाही. शेवटी पक्षात खांदेपालट होत असते. माझ्यावरील कारवाईआधी मीच राज ठाकरेंना सांगितलं होतं की, मे नंतर मला शहराध्यक्षपदावर राहायचं नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. “सरतेशेवटी पक्षाने निर्णय घेतलाय. मी राजसाहेबांचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. राजसाहेबांनी घेतलेला निर्णय मान्य आहे. त्यांच्यासोबत गेली २७ वर्ष मी काम करतोय साहेब हृदयात असतील. सध्यातरी मनसे सोडण्याचा माझा विचार नाही”, असं स्पष्टपणे वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.

प्रशांत जगताप यांची ऑफर!

वसंत मोरे यांना पदावरून पायउतार करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वसंत मोरेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. “वसंत मोरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागतच करू”, असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत. 

मनसेच्या अंतर्गत राजकारणातून वसंत मोरे यांना पदावरुन दूर सारण्यात आल्याचा संशय रुपाली पाटील यांनी व्यक्त केला आहे. वसंत मोरे यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या भूमिका या जनसामान्यांच्या असतात, लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांच्या कामाला तोड नाही, असं म्हणत रुपाली पाटलांनी वसंत मोरेंचं तोंडभरुन कौतुक केलं. दुसरीकडे त्यांनी मनसेच्या किशोर शिंदे यांना मात्र, माणसांमध्ये जाऊन पक्ष वाढवून दाखवा, असं चॅलेंजही केलं.

मनसे पक्षात अंतर्गत राजकारण खूप आहे. याच अंतर्गत राजकारणाला कंटाळून मी पक्षाचा राजीनामा दिला. वसंत मोरे यांच्यावर केलेल्या कारवाईचं मला वाईट वाटलं. पण साईनाथ बाबर यांच्यावर पक्षाने सोपविलेल्या जबाबदारीचं मला आश्चर्य वाटलं कारण वसंत मोरे यांना अनुकूल असलेलीच भूमिका साईनाथ बाबरने घेतली होती मग, एकाला हटवलं, दुसऱ्याकडे पद दिलं, हे असं का?, असा सवालही रुपाली पाटील यांनी उपस्थित केला.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये