अभिनेत्री आसावरी जोशी राष्ट्रवादीत; पुण्यात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. एका जाहिरातीतील ‘ढूंढते रह जाओगे’ हा त्यांचा डायलॉग लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला होता. पुणे महापालिका निवडणुकीत आसावरी जोशी यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतानाच त्यांनी महागाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. नवीन वर्षांच्या शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या, तुम्हा सर्वांना हे वर्ष आनंदाचे, सुख समाधानाचे, भरभराटीचे, आरोग्यदायी आणि जीवनावश्यक वस्तू योग्य दरात मिळण्याचे जाऊ दे, अशी अपेक्षा व्यक्त करते. मी राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन. म्हाडाच्या सोडतीत कलाकारांसाठी कोटा, मराठी चित्रपटाला उद्योजकाचा दर्जा देण्याची गोष्ट किंवा लोककलावंत इतर कलावंत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ देण्यासंदर्भातील सर्व कलाकारांचे प्रश्न या ठिकाणी मांडले जातात. या समस्यांवर उत्तर शोधली जातात आणि यासाठी झटणारा राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे म्हणूनच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, असे आसावरी जोशी यांनी स्पष्ट केले.




