कोथरूडमध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन..

कोथरूड : कोरोना महामारीमुळे अडीच वर्ष जनजीवन विस्कळीत झाले होते. या काळात जनसंपर्क तुटला, जिवाभावाची माणसं दिसेनाशी झाली. त्यावेळी माणसांना माणसांची किंमत कळली. या संकटसमयी जातधर्म विसरून मदतीचे हात पुढे आले. यावेळी फक्त दिसून आला तो माणुसकीचा धर्म. हाच माणुसकीचा धर्म पाळत जातीय सलोखा जपत आपण एकत्रित राहूया असे म्हणत कोथरुडमध्ये आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टी आनंदमय वातावरणात पार पडली. .
आपल्या महाराष्ट्राची सर्व धर्म समभाव ही उक्ती अवलंबून महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मराठा महासंघ वरिष्ठ उपाध्यक्ष नंदिनी पानेकर, राष्ट्रवादी ओबीसी शहर उपाध्यक्ष उर्मिला गायकवाड, शासकीय सेल शहर सचिव मीना मोरे यांच्या वतीने कोथरुड मधील “झिका उल्लाह मस्जिद” मध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवानी देखील सर्व धर्मीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आदराने स्वागत केले. एकजुटीने केलेला हा कार्यक्रम समाजाला खऱ्या अर्थाने ऐक्याची भावना शिकवणारा ठरला. भविष्य काळात देखील ही ऐक्याची भावना जपत समाजकारण-राजकारण वाढवू व महाराष्ट्र हा एकसंध ठेवू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी ओबीसी सेल शहराध्य दिपक जगताप, व्यापारी संघटनेचे भाऊसाहेब एकाड, विलास साळुंके,शहर सरचिटणीस सीताराम तोंडे, शहर उपाध्यक्ष आनंद तांबे, अब्दुल सय्यद, शमी शेख, आमीन शेख,आशा सय्यद, स्वाती जोरी, अनिता ढमाले, मंदाकिनी वनसाळे, दामिनी पथकच्या रुपाली घावटे उपस्थित होत्या.



