काँग्रेसकडून भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना विधान परिषदेची उमेदवारी

मुंबई : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांना काँग्रेसने विधान परिषदेची (Maharashtra MLC Election 2022) उमेदवारी दिली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या नावावर शिक्कोमोर्तब केल्याचे मानले जात आहे.
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मुकुल वासनिक (Mukul Wasnik) यांच्या सहीने हंडोरे आणि भाई जगताप यांच्या उमेदवारीचं नावाचं पत्रक काढलं गेलं आहे. मुंबईतील ‘वेस्टीन हॉटेल’ इथे काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री सुनील केदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राज्यसभेचा धुरळा खाली बसत नाही तोच विधान परिषदेची निवडणूक येत्या २० तारखेला होत आहे. १० जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अनेक दिग्गज नेते विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत. दरम्यान, भाजप शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ सदस्य निवडणूक जाऊ शकतात. मात्र आवश्यक संख्याबळ नसतानाही भाजपने पाचवा उमेदवार रिंगणात उतरवल्याने चुरस होऊ शकते.
शिवसेनेकडून कुणाला संधी?
राष्ट्रवादीतून आलेल्या सचिन अहिर आणि नंदूरबारचे कट्टर शिवसैनिक आमश्या पटेल यांना सेनेने विधान परिषदेची संधी दिली आहे. मंत्री आदित्य ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दोघा नेत्यांनी आज विधिमंडळात अर्ज दाखल केला.



