DSK च्या ग्राहकांचे कर्जाचे हफ्ते थांबण्यासाठी आंदोलन

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (D.S. Kulkarni) हे सध्या ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत आहेत. त्यांच्या ग्राहकांना पैसे भरूनही घरं मिळाली नाहीत. काढलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी बँकाकडून तगादा लावला जात आहे. 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज काढल्यामुळे सीबील स्कोअर खराब झाला आहे. नवीन कर्ज काढता येत नाही मात्र जुन्या कर्जाचे फक्ते भरावे लागतायेत. हे कर्ज माफ व्हावं यासाठी पुण्यातील टाटा फायनान्स (Tata Finance)कंपनीच्या बाहेर पीडित ग्राहकांनी आंदोलन केलं.
प्रकल्पात फ्लॅट बुक केलेल्या ग्राहकांनी आंदोलन करत कर्ज माफ करण्याची मागणी केली. डी. एस. कुलकर्णी यांची जप्त केलेली संपत्ती विकून कर्ज भरलं जावं, अशी मागणी यावेळी ग्राहकांकडून करण्यात आली. हातात निषेधाचे फलक घेत कर्ज माफीची मागणी यावेळी करण्यात आली. डी. एस. कुलकर्णी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करत प्रकल्प पुर्ण नसलेल्या ठिकाणी कर्ज घेतलं त्याचा परिणाम हा ग्राहकांना सहन करावा लागतोय, त्यामुळे ग्राहकांनी टाटा फायनान्स कंपनीच्या बाहेर आंदोलन केल्याचे सांगण्यात येत आहे.
डी. एस. कुलकर्णी यांनी बोगस गृहकर्ज काढून फसवणूक केल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. विविध बँकांसोबत हातमिळवणी करत घर बुक केल्यानंतर कर्ज मिळवून दिले. मात्र पैसे भरूनही घरं मिळालं नाही. मग कर्जाचे हफ्ते कसे भरणार? असा प्रश्न पीडित ग्राहकांना पडला आहे. त्यामुळे त्यांनी पुण्यातील टाटा फायनान्स कंपनीच्या बाहेर कर्जाचे हफ्ते थांबवण्याची मागणी करत आंदोलन केले आहे.



