उध्दव ठाकरे, शिंदे गटाला मिळाले हे नाव, ठाकरे गटाला चिन्हही

नवी दिल्ली : निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिलं आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव दिलं आहे.
निवडणूक आयोगानं निवडणूक चिन्हांबाबतही निर्णय दिला आहे. ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह उद्धव ठाकरे गटाला दिलं आहे. पण शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली आहेत. पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगानं दिली आहेत. शिंदे गटाने उद्या सकाळपर्यंत तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करायची आहेत, त्यानंतर शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाबाबत आयोग निर्णय घेणार आहे.
‘त्रिशूळ’ हे धार्मिक चिन्ह आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार हे चिन्ह राजकीय पक्षाला देता येणार नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या चिन्हावर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला होता. तर ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह डीएमकेचं निवडणूक चिन्ह आहे. ते एका राजकीय पक्षाचं वापरातील चिन्ह असल्याने निवडणूक आयोगानं ‘उगवता सूर्य’ हे चिन्ह अमान्य केलं आहे. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून निवडणूक आयोगानं ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह ठाकरे गटाला दिलं आहे.

यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “पहिल्याच प्रयत्नात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे पूर्णपणे जिंकले आहेत. आम्हाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे नाव मिळालं आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरेंचंही नाव राहिलं, बाळासाहेब ठाकरे हेही नाव राहिलं. तसेच आम्ही जे तीन पक्षचिन्ह दिली होती त्यापैकी मशाल हे चिन्ह मिळालं. त्यामुळे पहिल्याच राजकीय डावपेचात उद्धव ठाकरे जिंकले आहेत.”



“आम्ही आनंदी आहोत, पूर्णपणे समाधानी आहोत. कारण आमच्या बाळासाहेबांचं नाव चोरण्याचं अनेकजण प्रयत्न करत होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे हे नाव आमच्याकडे राहिलं. बाळासाहेब हे नाव बंडखोरांकडे गेलंय. मात्र, उद्धव, बाळासाहेब, ठाकरे ही तिन्ही नावं आमच्या मूळ शिवसेनेकडे राहिले. हा आमचा सर्वात मोठा विजय आम्ही मानतो,” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं.



शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे आम्हाला नाव मिळाले आहे. आम्ही पहिली लढाई जिंकली आहे. आता शिवसैनिकांनो आयुष्याच्या मशाली पेटवून हे चिन्ह प्रत्येक घराघरात पोहोचवायचे आहे. काही लोकांनी आपल्या पक्षात काळरात्र निर्माण करण्याचे ठरवले. आता उष:काल सुरू झाला आहे. ही मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल आहे, हे आता दाखवायचे आहे, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.




निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आम्ही खूप समाधानी आहोत, असे म्हस्के म्हणाले आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव तसेच त्यांचे तत्त्व घेऊन पुढे जात आहोत. बाळासाहेबांची शिवसेना हे नाव भेटल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे. चिन्हांचे पर्याय देण्यासाठी आम्हाला उद्या सकाळपर्यंत वेळ मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही नव्या चिन्हांची यादी देऊ. आम्हाला खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाला आहे. शिवसेनेने बाळासाहेबांचा विचार सोडला, तत्व सोडले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला त्यांच्या विचाराप्रमाणेच नाव मिळाले आहे, असे नरेश म्हस्के म्हणाले.



