शिंदे गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्यामागे मोठी शक्ती? शरद पवारांचे वक्तव्य

मुंबई : “निर्णय कोण घेतं याची शंका आमच्या मनात आहे. निवडणूक आयोग निर्णय घेतो की, त्यांना कोणाचं मार्गदर्शन आहे. यापूर्वी अनेकदा पक्षात फुटी झाल्या. समाजवादी पक्षात फूट होऊन प्रजा समाजवादी पक्ष झाला. कॉंग्रेसमध्ये फूट पडून समाजवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण झाले. मात्र, पक्षच काढून घेत दुसऱ्यांना देणं हे कधी घडलं नव्हतं. जे घडलं याच्या पाठीमागे मोठी शक्ती असल्याचं नाकारता येत नाही,” अशी शंका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
“तेव्हा काँग्रेस-आय आणि काँग्रेस-एस असं दोन पक्ष निर्माण झाले असते. काँग्रेस ‘एस’चा अध्यक्ष मी होतो. काँग्रेस ‘आय’च्या प्रमुख इंदिरा गांधी होत्या. तेव्हा काँग्रेस हे नाव वापरण्याचा अधिकार होता. नाव काढून घेतलं नाही. काँग्रेसने हात घेतला, तर आम्ही घड्याळ घेतलं,” असं शरद पवारांनी सांगितलं.
“निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह दुसऱ्यांना देण्याचा निर्णय आजपर्यंत कधी या देशात झाला नाही. सत्तेचा अतिगैरवापर होतो. एखाद्या पक्षाला आणि नेतृत्वाला नाउमेद करण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा लोक त्यांच्या मागे उभे राहतात. नेते शिवसेना सोडून गेले आहेत. कट्टर शिवसैनिक १०० टक्के उद्धव ठाकरेंबरोबर आहे. त्याची प्रचिती उद्या निवडणूका येतील तेव्हा कळेल,” असं विधान शरद पवारांनी केलं आहे.




