वायफळ खर्चाचे कारण देत सिरवी समाजाकडून वरातीत डीजे, प्री वेडिंग शूटवर बंदी

जयपूर : अनेक लग्नांमध्ये होणारा लाखोंचा खर्च अनेकदा वधू पित्यांसाठी त्रासदायक ठरतो ही बाब व वायफळ खर्च लक्षात घेऊन राजस्थानमधील सिरवी समाजाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. लग्नाआधी (Marriage) प्री वेडिंग शूट (Pre Wedding Shoot), वरातीमध्ये डीजे, हळदी समारंभ, लग्नाआधी मुलगा-मुलगी यांनी एकत्र बाहेर फिरण्यावर समाजाने बंदी घातली आहे.
सिरवी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी प्री वेडिंग शूट भारतीय संस्कृतीत बसत नसल्याचे म्हटलं आहे. सिरवी समाज परगना समितीने पालीच्या सोनाई मांझी गावात एक बैठक घेतली होती. या बैठकीत लग्नात होणारे वायफळ खर्च कमी करण्यावर चर्चा झाली. तसेच वरातीमध्ये डीजे आणि हळदी समारंभावर बंदी घालण्याबरोबरच नवरदेवाला आता या कार्यक्रमात क्लीन शेव करुन येण्याचा नियम बनवला आहे. सोनाई मांझीमध्ये सिरवी समाज परगना समितीच्या बैठकीत उपस्थित समाजबंधूंनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.
समितीच्या पट्ट्यात जेवढी पण गावे आहेत, त्या गावात राहणारे लोक त्यांच्या मुलांचे लग्नाआधी प्री वेडिंग शूट करणार नाहीत. तसेच लग्नाआधी मुलगा-मुलगी बाहेर फिरण्यास पाठवणार नाहीत, अशी तंबीच समितीने दिली आहे. लग्नाआधी वर-वधूच्या फोटो शूट आणि व्हिडिओ शूटवर पूर्णपणे बंदी राहील तसेच लग्न होईपर्यंत मुलगा-मुलगी फिरायला जावू शकत नाहीत. याबरोबरच वराला क्लीन शेव करुन यावं लागणार आहे, अशा नियम अटी समितीने घातल्या आहेत. सोनाई मांझीच्या कुकाराम कुटुंबाच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या बैठकीत मीडिया प्रभारी जगदीश भायल, गंगाराम काग, मोहनलाल सोलंकी, मानाराम काग, घीसाराम एवं मोहनलाल भायल यांच्यासह अनेक समाजबंधू उपस्थित होते.



