कोथरूडमध्ये रक्तदान महायज्ञास उत्स्फूर्त प्रतिसाद ; महाआरोग्य शिबिरात हजारो नागरिकांची तपासणी

कोथरूड : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि स्व.जनाबाई बलभीम मोकाटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रबोधन विचारधारा संस्थेच्या वतीने कोथरूड येथे रक्तदान महायज्ञ व महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे उपक्रमाचे 13 वे वर्ष होते.
यावेळी हजारो नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत विनामुल्य आरोग्यसेवांचा लाभ घेतला. आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्तदान शिबिरामध्ये ५२३ जणांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले. यामध्ये तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय होती.

या महाआरोग्य शिबिरात हृदयरोग तपासणी, नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, स्त्री रोग तपासणी, अस्थिरोग तपासणी, कॅन्सर तपासणी, मूत्ररोग तपासणी, बालरोग चिकित्सा, हिमोग्लोबिन तपासणी व जनरल चेक अप अशा विविध आरोग्यविषयक तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
या उपक्रमाचे उदघाटन युवसेना सचिव वरुण सरदेसाई, आदित्य शिरोडकर, अंकुश काकडे, बाळासाहेब दाभेकर, गजानन थरकुडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या उपक्रमास सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील निरनिराळ्या मान्यवरांनी हजेरी लावली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विकास पासलकर, माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील, प्रशांत बधे, अल्पना वर्पे, वासंती जाधव, दिलीप उंबरकर, मंजुश्री खर्डेकर, शिवराम मेंगडे, श्रद्धा प्रभुणे, अजिंक्य धात्रक आदी मान्यवरांनी उपस्थित राहत कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आयोजक माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी केले.



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु.जयश्री सुरेश निम्हण या कोथरूडमधील कन्येचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महाआरोग्य शिबिरात विविध आरोग्यसेवांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करून तपासणी करण्यात आली. व गरजूंवर विनामुल्य उपचार करण्यात आले. तपासणीनंतर ज्या गरजु रुग्णांना पुढील उपचारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करणार असल्याचे संयोजक अॅड.योगेश मोकाटे यांनी यावेळी सांगितले. या शिबिरासाठी देवयानी मल्टीस्पेशालिटी, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, लाईफ पोइंट हॉस्पिटल व आधार ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.






