कोथरूड बावधन प्रभाग समिती अध्यक्षपदी हर्षाली माथवड

प्रभाग समिती अध्यक्षांनी बदलला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील भगवा ध्वज
कोथरुड : कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समिती अध्यक्षपदी नगरसेविका हर्षाली माथवड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज पुणे महानगरपालिकेत प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडली. प्रभाग समिती अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी माथवड यांनी कोथरुड मधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारका जवळील जीर्ण झालेला भगवा ध्वज बदलला.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळील भगवा ध्वज गेल्या काही महिन्यांपासून जीर्ण झाला होता पण तो बदलण्याकडे पालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष झाले होते. आज जीर्ण झालेला भगवा ध्वज बदलून माथवड यांनी हा विषय पालिका अधिकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला.
या वेळी भाजपा कोथरुड मतदारसंघ अध्यक्ष पुनीत जोशी, दुष्यंत मोहोळ, दिनेश माथवड, सुनील गेहलोत बाळासाहेब विचारे, अमित तोरडमल, निलेश सोनावणे उपस्थित होते. निवड झाल्यानंतर हर्षाली माथवड यांचे महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.
हर्षाली माथवड म्हणाल्या की, स्मारकाजवळील भगवा ध्वज बदलण्याकडे पालिकेकडून कायम दुर्लक्ष होत होते. याबाबत अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून पालिकेने वेळोवेळी भगवा ध्वज बदलला नाही तर तो आम्ही आमच्या स्वखर्चातून बदलू असे त्यांना सांगितले आहे. प्रभाग समिती अध्यक्ष पदावरून काम करत असताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.



