गोव्यात भाजपला बसणार हादरा?

पणजी – महाराष्ट्रात एकनाथ खडसे हे भाजपचे मातब्बर नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि त्यातून महाराष्ट्रातील भाजपला पहिला राजकीय शह दिला गेला. यापाठोपाठ आता गोव्यातही काही राजकीय खेळी शरद पवार खेळणार का? अशी चर्चा सुरु आहे.
कुटुंबीयांसमवेत शरद पवार सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे आलेल्या आहेत. हा दौरा खाजगी असल्याचे सांगितले जात असले तरी त्यांच्या या दौऱ्याच्या दरम्यान गोव्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, गोव्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्य मंत्री दिगंबर कामत आणि काँग्रेसचे नेते अश्विन खलप यांच्या भेटी घेऊन पवारांनी त्यांच्याशी प्रदीर्घ राजकीय चर्चा केली. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्याच धर्तीवर गोव्यातील भाजप विरोधकांना एकत्र आणून भाजपला धक्का देण्याचा पवारांचा इरादा आहे का? अशी चर्चा गोव्यात आहे.






