जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा अमृता संदीप घोणे यांनी मिळवली पीएचडी

पुणे – जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा अमृता संदीप घोणे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमार्फत बँकिंग आणि वित्त या अभ्यास मंडळातून ‘विद्यावाचस्पती (Ph.D.)’ पदवी संपादन केली आहे. “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वित्तीय कामगिरी आणि समस्यांचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर त्यांनी आपले संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण केले.
हे संशोधन एम.एम.सी.सी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. किशोर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. डी. वाय. पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पुणे या संशोधन केंद्रातून पूर्ण करण्यात आले. तसेच संशोधन कार्यादरम्यान त्यांनी आपल्या विषयाशी संबंधित ९ संशोधन पत्रे राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करून प्रसिद्ध केली आहेत.
सौ. अमृता संदिप घोणे या जेजुरीच्या माजी नगराध्यक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश संघटक सचिव म्हणून कार्यरत आहेत. तसेच, कोल्हापूर जिल्ह्याच्या निरीक्षक म्हणूनही त्या जबाबदारी पार पाडत आहेत. त्याच बरोबरीने आपल्या उत्कृष्ट वकृत्व शैलीसाठी सुद्धा त्या ओळखल्या जातात. राजकीय क्षेत्रातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे सांभाळत असतानाही त्यांनी शिक्षणाची ओढ जपली. लग्नानंतर त्यांनी एम. कॉम. पदवी, पहिल्याच प्रयत्नात SET परीक्षा उत्तीर्ण, जीडीसी अँड ए आणि आता विद्यावाचस्पती ही पदवी संपादन करून उल्लेखनीय शैक्षणिक यश मिळवले आहे.
राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात एकाच वेळी उत्तुंग यश संपादन करणे ही अत्यंत उल्लेखनीय बाब असून त्या इतर महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत. यामुळे समाजातून त्यांचे कौतुक होत आहे.
या यशस्वी प्रेरणेमागे शाहु, फुले आंबेडकर यांची विचारधारा मार्गदर्शक ठरली, असे त्यांनी सांगितले. शिकण्याची आवड निर्माण करणारे आपले वडील श्री. अनिल ज्ञानेश्वर कांबळे यांचे त्यांनी ऋण व्यक्त केले. तसेच या यशस्वी शैक्षणिक व राजकीय प्रवासात त्यांना त्यांचे पती श्री. संदीप अशोक घोणे (माजी अध्यक्ष, खंडोबा देवस्थान ट्रस्ट, जेजुरी) यांचा मोलाचा पाठिंबा व प्रोत्साहन व सतत मिळणारा आधार हेच त्यांच्या यशामागील महत्त्वाचे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले. याबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांचा परिवार आणि सहकार्य करणाऱ्या सर्व हितचितंकांचे त्यांनी आभार मानले.




