पुण्याचं पाणी कमी करण्याचा डाव! जलसंपदाचा हा सुलतानी कारभार पुणेकर कदापिही सहन करणार नाहीत : मुरलीधर मोहोळ

पुणे : pune city पुणेकरांना गरजेचं असणारं पाणी कमी करण्याचा डाव पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. पुणे शहराचे पाणी कमी करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला असल्याने त्याचा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. जलसंपदा विभागाचा हा सुलतानी कारभार आणि दादागिरी पुणेकर कदापिही सहन करणार नाहीत असं मोहोळ यांनी म्हंटले आहे.
पुणे शहरात नव्याने समाविष्ट झालेली २३ गावे आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता दैनंदिन १ हजार ४६० एमएलडी पाणी खडकवासलातून आणि ३८० एमएलडी पाणी भामाआसखेडमधून पुरवठा होतोय. परंतु पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करत आहे. पालकमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुण्याचं पाणी कृपया कमी करु नये अशी विनंती मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.
पाणीगळती थांबवणे, पाणीबचत करणे, यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत.२४x७ समान पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत वेगाने सुरु असून ते काम लवकरच पूर्ण करणार आहोत. आमचे अनेक प्रयत्न सुरु असतानाही पोलीस बंदोबस्तात पाणी कमी करण्याचा निर्णय चीड आणणारा आहे.
शेतीला पाणी देण्यास आम्हा पुणेकरांचा अजिबातही विरोध नाही. मात्र प्राधान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला असायला हवं, याचं थोडंही भान जलसंपदा विभागाला असू नये? असा प्रश्न मोहोळ यांनी उपस्थित केला आहे.




