अबब… आता बक्षीस मिळणार एक किलो चिकन, अर्धा किलो पनीर

कोथरुड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोथरुडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास मांसाहारी असेल तर एक किलो चिकन व शाकाहारी असल्यास अर्धा किलो पनीर भेट देण्यात येणार आहे. एक प्रकारे रक्तदान केलेल्या व्यक्तीस प्रोटीनयुक्त आहार देण्याचा हा प्रयत्न असणार आहे. रविवारी २० डिसेंबर रोजी माजी सभागृह नेते शंकर केमसे यांच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोथरुड डेपो येथील शंकर केमसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात या शिबिराचे आयोजन २० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत करण्यात आले आहे. डॉ. संतोष वाघ, डॉ. सुर्यवंशी परशुराम, डॉ. अमित देशमुख, डॉ. सुनील अंभोरे, डॉ. प्रताप ठुबे, डॉ. जितेंद्र पवार, डॉ. विशाल जाधव, अमर सुतार, सी. एस. पाटील, अरुण कदम, अरुण भिकुले, राजेंद्र नायडू, भाऊसाहेब एकाड, संजय पवार, निलेश निवासी यांनी या शिबिराचे संयोजन केले आहे.
सध्या रक्तदान केल्यास रक्तदात्यास निरनिराळ्या भेटवस्तू दिल्या जातात. या शिबिरात मात्र रक्तदात्यास रक्तदान केल्यामुळे प्रोटीन युक्त आहार देण्याचा आम्ही विचार केला असल्याचे शंकर केमसे यांनी सांगितले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची कमतरता जाणवत आहे. सरकारने देखील रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या संकट काळात रक्तदान करून देशाप्रती आपले कर्तव्य बजावण्याची आवश्यकता आहे.







