पुण्यात गोवरसाठी विलगीकरण कक्ष

पुणे : गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत महापालिकेने डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयात विलगीकरण कक्ष कार्यान्वित केला आहे. या कक्षात ५० खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार ही उपाय योजना करण्यात आली आहे.रुग्ण आढळल्यास ७ दिवसांच्या विलगीकरणासाठी ही सुविधा असेल.
राज्यात भिवंडी, मुंबई आणि मालेगांव येथे गोवर आजाराची साथ आढळून आली आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. बालकांना ताप, सर्दी, खोकला येणे, घशात दुखणे, अंग दुखणे, अशक्तपणा, लाल रंगाचे पुरळ येणे, डोळे लाल होणे, तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे चट्टे अशी या आजाराची लक्षणे आहेत. शहरात गोवर आजाराचा एकही रुग्ण महापालिकेच्या आरोग्य विभागाला आढळून आलेला नाही. सर्दी, खोकला, अंगावर पुरळ असलेल्या संशयित रुग्णांचे नमुने घेऊन राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत.
महापालिकेच्या सर्व दवाखाने आणि बाह्यरूग्ण विभागामध्ये गोवरची लस
महापालिकेच्या सर्व दवाखाने आणि बाह्यरूग्ण विभागामध्ये गोवरची लस देण्यात येत आहे. ९ ते १६ महिने आणि १६ ते २४ महिन्यांच्या बालकांनी गोवरची मात्रा देण्यात येते. यासाठी महापालिका प्रशासनाकडे पुरेसा साठासुद्धा उपलब्ध आहे, असे सहाय्य आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.




