‘साऊ फाउंडेशन’च्या युपीएससी सुपर – 40 तिसऱ्या बॅचचा स्वागत समारंभ उत्साहात

गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य युपीएससी प्रशिक्षण
पुणे : साऊ फाउंडेशन व जनसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे यूपीएससीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य युपीएससी प्रशिक्षण केंद्र चालवत आहे. वीस मुले व वीस मुली अशा 40 विद्यार्थ्यांना हे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. या प्रकल्पाच्या २०२६-२७ वर्षासाठी तिसऱ्या बॅचचा स्वागत समारंभ 25 जुलै 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाच्या महाराष्ट्र राज्य आयुक्त दीपा मुधोळ- मुंडे (भा.प्र.से) उपस्थित होत्या. विशेष उपस्थिती मध्ये पुणे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे उपस्थित होते. यावेळी बोलताना दीपा मुधोळ-मुंडे यांनी अशा या समाज उपयोगी प्रकल्पाची सुरुवात केल्याबद्दल साऊ फाउंडेशनचे अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना अधिकारी बनवून समाजातील तळागाळातील लोकांसाठी काम करावे असे आवाहन केले. तसेच अभ्यास कसा करावा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलत असताना विशाल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना शिव-फुले-शाहू- आंबेडकर यांची विचारधारा अंगीकृत करण्याचे आवाहन केले.



साऊ फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सचिन शिंदे यांनी साऊ फाउंडेशन अशाप्रकारे अजून तळागाळातील लोकांसाठी काम करेल व समाज उन्नतीचे काम करेल याची ग्वाही दिली. जनसेवा फाउंडेशनच्या ट्रस्टी केतकी देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व जनसेवा फाउंडेशन कायम विद्यार्थ्यांसोबत असण्याची ग्वाही दिली. यावेळी साऊ फाउंडेशनचे संचालक व यूपीएससी कोर्स डायरेक्टर अमृत साळुंखे व गुणवंत सावळजकर तसेच साऊ फाउंडेशनचे संचालक संदीप कांबळे, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली.






