अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’ जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले आहे.
अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.
अशोक सराफ यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी त्यांना हा मोलाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, वजीर, भस्म्या, खरा वारसदार, धुमधडाका, गंमतजंमत, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येदेखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या ते शेंटिमेंटल या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकत आहेत.
चित्रपटसृष्टीत येण्याआधी ते एका सरकारी बँकेत काम करत होते. त्यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केल्यानंतरही काही वर्षं बँकेत काम केले. 1974ला त्यांनी पहिला चित्रपट केला. आजही ते काम करतच आहेत. मराठी रंगभूमीसह मराठी आणि हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदानाबद्दल अशोक सराफ यांना हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे.