बाळासाहेब आणि राज ठाकरे यांचा शेवटचा ‘राज’कीय संवाद.. जा लढ.. पहा व्हिडिओ…

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्ताने राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बाळासाहेबांना विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून अभिवादनही केलं जात आहे. बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसेने आपल्या ट्विटर हँडलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडतानाच्या शिवसेनाप्रमुखांसोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
23 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मनसैनिकांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी शिवसेना सोडतानाचा किस्सा ऐकवला. शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरे यांची शेवटची भेट घेतली होती.
त्यावेळी बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? हे पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. तोच व्हिडीओ मनसेने आज शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचं औचित्य साधून ट्विट केला आहे.

बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच हा व्हिडीओ ट्विट करण्यात आल्याने तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेनेत बंड केल्याचा आरोप केला जातो. राज ठाकरे यांच्यावरील हा आरोप पुसून टाकण्यासाठीच मनसेने हा व्हिडीओ ट्विट केल्याचं सांगितलं जात आहे.
1.33 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओवर जा लढ, मी आहे… काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात… राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा ‘राज’कीय संवाद!, अशी पोस्ट करण्यात आलेली आहे.