आपल्या आचारातून आणि विचारांमधून मराठी भाषा दिसायला हवी : डॉ. जी.पी. सातव .

मामासाहेब मोहोळ महाविद्यालय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रम
कोथरूड : “मराठी साहित्य खूप मोठे आहे. त्याची ओळख करून घेणे व आजच्या पिढीला ओळख करून देणे गरजेचे होत चालले आहे. केवळ आपल्या बोलण्यातून नव्हे, तर आपल्या आचारातून आणि विचारांमधून देखील मराठी भाषा दिसायला हवी.तरच मराठी भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध होईल. आणि ही जबाबदारी आजच्या तरुण पिढीची आहे. असे मत प्राचार्य डॉ. जी.पी. सातव यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालय मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातव बोलत होते.
सातव पुढे म्हणाले, तरुण पिढी परदेशांत उच्च शिक्षणासाठी जाते, तिथे जाऊन त्यांनी तिथली बोलीभाषा जरूर शिकून घ्यावी; परंतु आपली मायबोली मराठी भाषा ही बोलावी. मुळात मराठी भाषा जतन करण्यापेक्षा समृद्ध केली पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण वाचन संस्कृती जपली पाहिजे.

या प्रसंगी काव्यवाचन स्पर्धेमध्ये एकूण ४६ विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले. यामध्ये प्रथम क्रमांक विघ्नेश जोशी व्दितीय क्रमांक सुरज शिराळे तर तृतीय क्रमांक कटारे गीता यांनी पटकावला. प्रा. संतोष मोरे यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सातव जी. पी., डॉ. शिवाजी शिंदे, मराठी विभाग प्रमुख डॉ. एम. एम.बागुल, डॉ. मेघना भोसले, डॉ.श्रीनिवास इपलपल्ली, डॉ. आदिनाथ पाठक, प्रा. तानाजी जाधव,श्री. गणेश साबळे व इतर प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. सातव जी. पी. यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभाग प्रमुख डॉ. बागुल एम. एम.यांनी केले.