महाराष्ट्र

गुजराती, राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानीच राहणार नाही : भगतसिंह कोश्यारी

मुंबई : मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास येथे पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप होत आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या चौकाला दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी भगतसिंह कोश्यारी बोलत होते. भगतसिंह कोश्यारी म्हणाले, “कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”

जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील दाऊद बाग जंक्शन येथील चौकाच्या नामकरण व उद्घाटन सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते. सचिन सावंत यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती, राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये