ताथवडे उद्यानात बसविलेल्या सिंगापूर मरलॉयनच्या संकल्पनेवरील कारंज्याचा नागरिक घेतायत आनंद..

कोथरूड : प्रभाग १३ हॅपी कॉलनी, एरंडवणा मधील ताथवडे उद्यानात बसविलेल्या मरलॉयन च्या संकल्पनेवरील कारंज्याचा आनंद घेताना नागरिक दिसत आहेत. या कारंज्यामुळे परिसरातील मुलांना एक अनोखी सफर घडत आहे. स्थानिक नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या महापालिकेच्या विकासनिधीतून बनवण्यात आलेल्या या कारंज्याचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष , आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. Citizens enjoy the fountain concept of Singapore Merlion installed in Tathawade Park.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, भाजपच्या नगरसेवकांनी प्रभागाचा विकास करताना पाणी, कचरा, रस्ते, पदपथ यासह दैनंदिन नागरी समस्या सोडवण्यासाठी काम करत असतानाच नागरिकांची मानसिक भूक भागविण्यासाठी ही कार्य करावे. लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्यांकडे संवेदनशीलतेने पहावे आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. नागरिकांच्या दैनंदिन गरजा भागल्यावर ते मानसिक आणि बौद्धिक भूक भागविण्यासाठी प्रयत्न करतात. अशा वेळी बागेतील निवांत क्षण आणि तेथील नयनरम्य कारंज्याच्या सान्निध्यात त्यांना प्रसन्न वाटते.

नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या, शहीद मेजर प्रदीप ताथवडे उद्यानात विविध विकास कामे करताना आनंद होतो आहे. हे उद्यान या परिसरातील आबालवृद्ध नागरिकांचे दोन क्षण विसाव्याचे ठिकाण आहे आणि म्हणूनच येथे ओपन जिम निसर्ग कट्टा, उत्तम हिरवळ अशी कामे करुन घेतल्यानंतर आता ही सिंगापूरच्या मरलायन च्या धर्तीवर नव्याने उभारलेली कारंजी नयनरम्य ठरतील. याठिकाणी आत्ताच अनेक नागरिक सेल्फी घेताना दिसत आहेत तर काही आजीआजोबा नातवांच्या अंगावर पडणाऱ्या कारंज्याच्या तुषारांचा आनंद घेत आहेत,यातून कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळत आहे.

नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, माधुरी सहस्त्रबुद्धे, जयंत भावे व प्रांजल ताथवडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजप पुणे शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्य ॲड.मिताली सावळेकर , बाळासाहेब टेमकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, कोथरूड मंडल सरचिटणीस अनुराधा एडके, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, शहीद मेजर ताथवडे यांची पुतणी प्रांजल ताथवडे, प्रभाग अध्यक्ष राजेंद्र येडे,सरचिटणीस बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, ॲड.प्राची बगाटे, महिला अध्यक्ष साधना लोकरे,ओ बी सी आघाडी अध्यक्ष रमेश चव्हाण,यांच्यासह विविध पदाधिकारी,नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
या उद्यानात २० वर्षे सेवा केल्यानंतर निवृत्त होणाऱ्या सेविका रंजना वांजळे आणि कारंजे उभारणारे संतोष शिंदे यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.