५५ वर्षे आमदार, पण एसटीचा प्रवास सोडला नाही ; गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली

विधानसभेत ११ वेळा निवडून आलेले म्हणजेच ५५ वर्षे आमदार पद उपभोगलेले गणपतराव देशमुख Ganapatrao Deshmukh यांनी कधीच एसटी शिवाय प्रवास केला नाही. अशी साधी राहणीमान असलेल्या गणपतराव देशमुख यांचं शुक्रवारी संध्याकाळी सोलापूर मधील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना ९५ व्या वर्षी निधन झाले.
सांगोला मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशमुख यांनी कधीच बडेजावपणा केला नाही. नेहमी एस टी ने प्रवास केला. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पासून ते देवेंद्र फडणवीस अशा मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी विधानसभेत काम केले.
राजकारणात साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले ; उध्दव ठाकरे
राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्विक व्यक्तिमत्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्त्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील.
मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला ; अजित पवार “ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. राजकारणाला नैतिक अधिष्ठान दिलं. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधिमंडळाचा गौरव वाढवला. गणपतराव आबांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे.महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे स्मरण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.




