सेट पेपरफुटी प्रकरणात कठोर व पारदर्शक चौकशीची मागणी..

पुणे शहर भाजयुमो अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्याकडून कुलगुरूंना निवेदन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट पेपरफुटी प्रकरणातील कबुलीनंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या गोंधळ आणि विश्वासहानी लक्षात घेऊन पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. दुष्यंत मोहोळ यांनी आज कुलगुरूंना निवेदन सादर करून विद्यापीठ प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत अशी मागणी केली.
अलीकडील वृत्तांनुसार आरोपींनी प्रश्नपत्रिका प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन २५–३० विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याची कबुली दिल्यानंतर या प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, ताण आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून परीक्षेच्या संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे—
सेट विभागातील समन्वयक, जबाबदार अधिकारी आणि प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या प्राध्यापकांची उच्चस्तरीय, स्वायत्त व निष्पक्ष चौकशी करावी.
चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर शिस्तभंगात्मक व कायदेशीर कारवाई तातडीने करावी.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सेट परीक्षेच्या प्रक्रियेचे टेक्निकल ऑडिट, सुरक्षा पुनरावलोकन व अधिक पारदर्शक प्रणाली लागू करावी.
विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि अविश्वास दूर करण्यासाठी विद्यापीठाने स्पष्ट, जवाबदार आणि विश्वास देणारे अधिकृत निवेदन त्वरित जारी करावे.
परीक्षेच्या स्वच्छतेला बाधा आणणाऱ्यांविरुद्ध शून्य-सहिष्णुतेची नीती जाहीर करावी.
दुष्यंत मोहोळ यांनी निवेदनात नमूद केले की, सेट परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरवणारी महत्वाची पायरी आहे. या परीक्षेतच पेपरफुटी होणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या कष्टांचा आणि प्रामाणिकतेचा गंभीर अनादर असून, विद्यापीठ प्रशासनाने विलंब न करता निर्णायक आणि पारदर्शक कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
हे निवेदन दुष्यंत मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कुलगुरूंना सादर करण्यात आले. यावेळी पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे शिवा बारबे,पंकज गिते, किरण ओरसे, सूरज शिंदे, मनीषा धारणे, तेजस मारणे, अथर्व कुलकर्णी, समीर जोरी, सुचित देशपांडे,प्रतीक कुंजीर, पदाधिकारी उपस्थित होते.






