महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम होणार जाहीर; संभाव्य तारखा समोर,राज्य निवडणूक आयोग लागले कामाला

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. 15 ते 20 डिसेंबरदरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडून 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे. तर राज्यातील 29 महानगरपालिकांचा विचार करता फक्त चंद्रपूर आणि नागपूर मनपात आरक्षण मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. तुलनेत जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्के आरक्षणाचा घोळ जास्त आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आधी घेणे सोयीस्कर वाटत असल्याने त्यादृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी 4 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली, याचा आढावा घेतला जाणार आहे.

आयोगाने आता दुसऱ्या टप्प्यात महापालिकांची निवडणूक घेण्याचे नियाजन केले आहे. मात्र, त्यासाठी १० डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्या दिवशी महापालिकांची वॉर्डनिहाय मतदार यादी अंतिम होणार आहे. आयोगाकडून १० डिसेंबर रोजी त्यासंदर्भात आढावा घेतला जाईल. त्यानंतर दुसरा टप्पा जाहीर केला जाईल,10 जानेवारी पर्यंत निवडणूक होण्याची शक्यताही आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केली आहे.
महापालिका निवडणुकांच्या संदर्भात कुठलाही अडसर नसल्याने आणि सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा कुठलेही निर्देश याबाबत दिलेले नसल्याने महापालिका निवडणुका सुद्धा नगरपालिका नगरपंचायती निवडणुकीनंतर घेण्यासंदर्भात हालचाली राज्य निवडणूक आयोग करत आहे. ज्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. त्या 17 जिल्हा परिषदांच्या निवडणुका कोर्टाच्या निर्देशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेऊ शकते. जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भातली पूर्ण तयारी राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 21 जानेवारीमध्ये असल्याने निवडणुका फार पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्या निवडणुकांमध्ये आरक्षण मर्यादेचा अडसर नाही त्या ठिकाणी निवडणुका देण्याचा मार्ग राज्य निवडणूक आयोगासाठी मोकळा आहे.



