खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर मोठ्या मताधिक्याने विजयी..

खडकवासल्याच्या प्रत्येक नागरिकाचा आवाज हा माझ्यासाठी प्राधान्य असेल : भीमराव तापकीर
खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजप माहितीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांचा पराभव करत विजय संपादन केला. भीमराव तापकीर यांना १ लाख ६३ हजार १३१ मते मिळाली तर सचिन दोडके यांना १ लाख १० हजार ८०९ मते मिळाली. भीमराव तापकीर यांनी ५२ हजार ३२२ एवढया मताधिक्याने विजयी मिळविला.

खडकवासला मतदारसंघांमध्ये भाजपचे भीमराव तापकीर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सचिन दोडके तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मयुरेश वांजळे निवडणुकीच्या रिंगणात होते. चूरशीची लढत म्हणून या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष राहून राहिले होते. मनसेचे मयुरेश वांजळे किती मते घेणार याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. मयुरेश वांजळे यांच्या मतांचा फटका सचिन दाडके यांना बसेल असे सुरवातीपासून बोलले जात होते. मयुरेश वांजळे यांनी ४२ हजार ८९७ मते मिळाली. त्यामुळे या मतांचा फटका दोडके यांना बसल्याचे दिसत आहे.



निवडून आल्यानंतर भीमराव तापकीर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले “खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या तमाम नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाने मला पुन्हा एकदा आपला प्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी दिली आहे, यासाठी मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. हा विजय केवळ माझा नाही, तर आपल्या सर्वांचा आहे. हा विजय आपल्या विकासाच्या स्वप्नांचा, आपल्या समस्यांच्या समाधानाचा, आणि एकत्रित काम करण्याच्या निर्धाराचा आहे.
आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेल्या प्रेमाने आणि भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच आज ही वेळ आली आहे. हा विजय हा फक्त निवडणूक लढविण्याचा नव्हे तर आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचा महत्त्वाकांक्षी आराखडा प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प आहे.
आता पुढील वाटचाल ही आपणा सर्वांच्या सहकार्यानेच होईल. खडकवासल्याच्या प्रत्येक नागरिकाचा आवाज हा माझ्यासाठी प्राधान्य असेल. मला खात्री आहे की, आपल्या एकतेच्या जोरावर आपण आपल्या मतदारसंघाला विकासाच्या नवीन उंचीवर नेऊ.





