वारजेत ७५ माजी सैनिकांचा सन्मान करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिमाखात साजरा

वारजे : अमृत महोत्सवी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वारजेत ७५ माजी सैनिकांचा दिमाखदार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. माजी विरोधी पक्षनेत्या, नगरसेविका दिपाली धुमाळ आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. एकाच व्यासपीठावर देशासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या माजी सैनिकांचा मोठ्या संख्येने सन्मान होणार असल्याने या विशेष कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिध्द गायक डॉ. अनघा राजवाडे व संजय मरळ यांच्या राष्ट्रभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमात सादर झालेल्या देशभक्तीपर गीतांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवात देशभक्तीचे रंग भरले .










