कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता फार कमी

नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनामुळे 10 शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. चीनसोबतच यूरोप आणि हॉंगकॉंगमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतात देखील कोरोनाची तिसरी लाट येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर कोविड टास्क फोर्सचे हेड डॉक्टर नरेंद्र कुमार यांनी योग्य काळजी घेतल्यास भारतात कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता फार कमी असल्याचे म्हटले आहे.
भारतात कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता फार कमी आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे देशात जेव्हा कोरोनाची तिसरी लाट आली होती, तेव्हा अनेकांना ओमिक्रॉनचा उपप्रकार असलेल्या BA.2 याच विषाणूची लागण झाली होती. याचाच अर्थ भारतातील नागरिकांमध्ये BA.2 विरोधात लढा देणारी प्रतिपींडे ऑलरेडी तयार झाली आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाची आणखी एक नवी लाट येईल असे वाटत नाही, असे डॉ. नरेंद्र कुमार यांनी सांगितले आहे.
लसीकरण महत्त्वपूर्ण
भारतात कोरोनाची नवी लाट न येण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे भारतात लसीकरणाला वेग आला आहे. देशातील बहुता:श नागरिकांनी लसीचे दोनही डोस घेतले आहेत. तसेच सर्वाधिक धोका हा साठ वर्षांवरील वृद्धांना असतो. तर त्यांच्यासाठी आता आपण बुस्टर डोस चालू केले आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता फारच कमी असल्याचेही नरेंद्र कुमार यांनी म्हटले आहे. लसीकरण, मास्कचा वापर, साबणाने हात स्वच्छ धुणे, सुरक्षित योग्य अंतर राखणे ही चतुर्सुत्री आजही आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




