माझ्या रक्ताने लिहून देतो, कर्नाटकात काँग्रेस 150 जागा जिंकणार : डी.के. शिवकुमार

हुबळी : कर्नाटकात काँग्रेस 150 जागा जिंकेल, हे मी माझ्या रक्ताने लिहून देऊ शकतो, असे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. काँग्रेसने सत्ताधारी भाजपसमोर कडवे आव्हान उभे केल्याचे चित्र दिसत आहे. माजी मुख्यमंत्री जगदिश शेट्टर यांनी नुकताच भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी म्हटले होते की, माजी मुख्यमंत्री जगदिश शेट्टर हे हुबळी-धारवाड मतदारसंघातून पराभूत होतील हे मी माझ्या रक्ताने लिहून देतो. त्यावर डी.के. शिवकुमार यांनी प्रतिक्रिया देताना कर्नाटकात शेट्टर यांच्या जागेसह काँग्रेस 150 जागांवर जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

अन्यायकारी आणि जनतेला खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपला आम्ही धुळ चारु असे देखील डी.के. शिवकुमार यावेळी बोलताना म्हणाले. भाजपकडून शिवकुमार यांना लक्ष्य केले जात असल्याच्या तसेच त्यांच्या विरोधात कनकपूरा येथून माजी महसूल मंत्री आर. अशोक यांना पाठबळ देण्याच्या मुद्द्यावर बोलतांना ते म्हणाले, भाजपच्या डावपेचांना आम्ही घाबरत नाही, त्यांना काहीही करुद्या आम्ही आमचे लक्ष विचलीत होणार नाही.
डी.के. शिवकुमार यांचे बंधू डी.के. सुरेश यांनी देखील कनकपूरा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जर डी.के. शिवकुमार यांचा अर्ज बाद झाला, तर डी.के. सुरेश यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्याचे काँग्रेसचे धोरण होते. मात्र शिवकुमार यांचा अर्ज स्विकारला गेला असून शिवकुमार आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत.






