संविधानिक नैतिकता प्रगल्भ समाजासाठी आवश्यक : दिलीप बराटे

वारजे : pune city, warje संविधानिक नैतिकता हे मूल्य आपण समजून घेतले पाहिजे आणि प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजे. संविधानिक नैतिकता ही यशस्वी लोकशाहीची महत्त्वपूर्ण अट आहे. संविधानिक नैतिकते शिवाय लोकशाही टिकू शकत नाही आणि ही नैतिकता केवळ राजकीय पक्ष नेते, कार्यकर्ते यांनीच दाखवणे अपेक्षित नसून सर्व भारतीय नागरिकांनी सुद्धा ती नैतिकता दाखवली पाहिजे असे मत नगरसेवक संस्कार मंदिर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप बराटे यांनी व्यक्त केले.
संस्कार मंदिर संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय आणि पार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे उद्घाटन दिलीप बराटे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागामार्फत नियोजन करण्यात आलेल्या सदर कार्यशाळा दि. ११ ते १६ ऑक्टोबर २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
बराटे हणाले की, केवळ आपले हक्क अधिकार काय आहेत एवढेच न बघता आपले कर्तव्य आपल्या जबाबदाऱ्या यांचेही भान ठेवणे आजच्या युवकांपुढील महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. आपल्या देशातील विचारधारा कायदे, नियम याची माहिती असणे, स्वतः नियम पाळणे व इतरांनाही पाळण्यास प्रोत्साहित करणे हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे असे मी मानतो. कार्यशाळेतील पहिल्या दिवशी ॲड. निलेश खानविलकी यांनी Knowing Constitution’ या विषयावर मार्गदर्शन केले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र थोरात यांनी अध्यक्षीय भाषणात असे नमूद केले की, संविधानाच्या मुलभूत तत्वांची माहिती ही प्रत्येक ज्ञानशाखेच्या विद्यार्थ्यास असली पाहिजे व त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. यावेळी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. कविता मुनेश्वर यांनी कार्यशाळेचे महत्त्व व रूपरेखा स्पष्ट केली. डॉ. स्वप्नील गायकवाड यांनी पार्थ फाउंडेशनचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले. डॉ. ललिता कानगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



