“…तर मोदीही मला संपवू शकत नाही”; पंकजा मुंडेंचे वक्तव्य

बीड : “मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाही,” असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं. कधी विधान परिषदेवर उमेदवारी न मिळाल्याने, तर कधी राज्यातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या नाराजीबाबत तर्कवितर्क लावले जात असतानाच त्यांनी हे वक्तव्य केलं असल्याने राज्यात चर्चेला उधाण आलं आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, “आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीही वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते मला संपवू शकत नाही.”

“आपल्याला राजकारणात स्वच्छता आणायची आहे. त्यासाठी आपल्याला राजकारणात बदल करावे लागतील. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी पैसे छापण्याचं मशीन नाही की, पैसे छापा आणि राजकारणावर खर्च करा. सध्या राजकारण करमणुकीचं साधन व्हायला लागलं आहे. गणेशमंडळ करा, नवरात्री, दांडीया करा, गरबा करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा. अरे काय चाललं आहे हे? हे आमचं काम नाही,” असं मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केलं.



“जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी यांना हे अपेक्षित नाही. माझं काम संस्कृती जपणं आहे हे मान्य आहे. मात्र, माझं काम देशाला काही तरी देणंही आहे. असाच प्रत्येकाने विचार केला पाहिजे, असं मला वाटतं,” असंही पंकजा मुंडेंनी नमूद केलं.



