खासदार गिरीश बापट यांचे निधन

पुणे : खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे.
1973 पासून ते राजकारणात सक्रिय होते. पुण्यात भाजपची यशस्वी वाटचाल करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. पुण्याची ताकद गिरीश बापट अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुण्यातील कसबा मतदार संघात आणि इतर पुण्यात भाजप पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत केली होती.
टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. 1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 1993 ला झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिलं नाही.1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते.

बापट यांनी आपल्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करून केली. 1980 मध्ये त्यांची पुणे शहर भाजपच्या सचिवपदी नियुक्ती झाली. 1983 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा पुणे महापालिकेत निवडून आले आणि त्यानंतरच्या तीन वेळा जिंकले. 1986-87 मध्ये त्यांची पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाली. 1995 मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1997 मध्ये त्यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाली. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुणे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.



