दगडूशेठ गणपतीची मोहन भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार

पुणे : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा भाद्रपद चतुर्थी, मंगळवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटे या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, डॉ.बाळासाहेब परांजपे, सरचिटणीस हेमंत रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता श्रींची आगमन मिरवणूक, श्री हनुमानाच्या ४ मूर्ती आरूढ केलेल्या, फुलांनी सजविलेल्या रथातून काढण्यात येईल. प्राणप्रतिष्ठेनंतर दुपारी १२ वाजल्यापासून उत्सव मंडप श्रींच्या दर्शनासाठी भाविकांना खुला केला जाईल.
अयोध्येतील श्रीराम मंदिराचा देखावा या वेळच्या उत्सवात साकारण्यात येणार आहे. दर्शनासाठी बेलबाग चौकातून काल्पनिक रामसेतू उभारण्यात येईल आणि त्यावरून भाविकांना श्रींच्या मूर्तीच्या दर्शनासाठी जाता येईल.











