पुणे शहर

कोथरूड मधील रस्ता मोजणीत  गायब करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर वरिष्ठांचा हात ? निलंबनाच्या कारवाईच्या मागणीने धरला जोर..

कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ

कोथरूड : कोथरूड मधील श्री गणेश कृपा सहकारी गृहरचना संस्था पुनर्विकासासाठी मोजणी करताना सोसायटीच्या पश्चिमेकडील श्री कॉलनीतील महापालिकेने निधी टाकून तयार केलेला रहदारीचा रस्ता गायब करणाऱ्या मोजणी कर्मचारी (भूकरमापक) अधिकाऱ्यांवर कारवाई केली असल्याचे सांगितले जात असले तरी कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. या गंभीर प्रकरणात संबधित कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जावे अशी मागणी आहे.

या प्रकारामुळे रस्ता गायब करण्यासारखा गंभीर प्रकार करणाऱ्या मोजणी कर्मचारी (भूकरमापक)यांना वरिष्ठांकडून पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. या कारवाईबाबत  नगर भूमापन अधिकारी क्रमांक १ गणेश कराड यांना माहिती विचारली असता त्यांच्याकडून ती देण्यास विलंब लावला जात आहे, त्यामुळे गंभीर प्रकार करूनही संबधित कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी दिखावू कारवाई तर केली नाही ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मोजणी कर्मचारी (भुकरमापक)सोमनाथ साळुंखे यांनी मोजनीत श्री कॉलनीतील रस्ता गायब करून चुकीची मोजणी केली, त्यावर सदर मोजनी बाबत विशाल भेलके यांनी तक्रार करून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर तत्कालीन नगर भूमापन अधिकारी संजय कुंभार यांनी सागर पाटील व नितीन वाडकर यांना जागेवर स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाला न जुमानता त्यांनी दोन वर्ष होऊन गेले तरी तो अहवाल सादर केला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून फौजादरी गुन्हा दाखल करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.


सुरवातीपासूनच या प्रकरणात मोजणी कर्मचाऱ्यापासून वरिष्ठांचाही सहभाग असल्याची चर्चा कोथरूड परिसरात असून तसा आरोपही तक्रारदारांकडून करण्यात येत आहे.  रस्ता गायब करण्याचा गंभीर प्रकार केल्यानंतर संबधित कर्मचाऱ्यांचे केव्हाच निलंबन व्हायला हवे होते पण केवळ  वरिष्ठांचा हात पाठीवर असल्याने ते उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यामुळे या विभागातील भोंगळ कारभार आणि अधिकाऱ्यांचा निगरगट्ट पणा समोर आला आहे.

नगर भूमापन अधिकारी क्रमांक १ गणेश कराड यांनी दिवाळीपूर्वी संबधित दोन्ही कर्मचाऱ्यांना कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले होते. पण अद्यापपर्यंत त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे हे त्यांच्याकडून सांगितले जात नाही. 

काय आहे रस्ता गायब प्रकरण

कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक ते एकलव्य कॉलेज डिपी रस्त्यावर असणाऱ्या गणेश कृपा हौसिंग सोसायटीच्या पुनर्विकासासाठी त्यांच्या जागेची मोजणी मोजणी कर्मचारी (भूकरमापक) सोमनाथ साळुंके यांनी केली होती. ही मोजणी करताना त्यांनी मोजणी नकाशावरून सोसायटीच्या शेजारून गेलेला महापालिकेने निधी टाकून काँक्रीटीकरण केलेला रस्ता गायब केला. नंतर रस्ता नसलेला मोजणी नकाशा सादर करून येथील बांधकाम प्रकल्प महापालिकेकडून मंजूर करण्यात आला होता.

रस्ता आत घेऊन बांधकाम करण्यासाठी संबधित बांधकाम व्यावसायिकाने पत्रे लावल्याने श्री कॉलनीतील रहिवाशांना आपला रस्ता बंद केला जात असल्याची माहिती झाली. यानंतर येथील रहिवाशी विशाल भेलके यांनी याबाबत नगर भूमापन विभागाकडे तक्रार देऊन याबत पाठपुरावा केला तेव्हा येथील श्री कॉलनीतील रस्ता मोजणी नकाशात गायब केल्याची बाब समोर आली आणि येथील रस्ता पुन्हा नकाशावर यावा यासाठी त्यांचा लढा सुरू झाला.

भेलके यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे भूमापन विभागाला पाहणी करून रस्ता गायब केलेली नकाशाची ‘क’ प्रत रद्द करावी लागली व नकाशावर गायब झालेला रस्ता दाखवून नवीन क प्रत तयार करावी लागली. परंतु हितसंबंध जोपासत हेतुपुरस्सर नकाशावरील रस्ता गायब केला गेला असून संबधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी या प्रकरणात भेलके यांनी केली आहे.

प्रत्यक्ष जागेवरील महापालिकेने निधी टाकून केलेला रस्ता मोजणीत असाच सहज गायब होणार नाही यामागे मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी विशाल भेलके यांनी केला असून या प्रकाराची सखोल चौकशी चौकशी होऊन संबंधितांवर निलंबनाची कारवाई होऊन फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचे भेलके यांनी सांगितले.

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192
Img 20240202 wa00029218339254755901166
Img 20230717 wa0012281298961742807603730839

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये