वारजे परिसरातील वाहतूक कोंडी प्रश्नात उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष घालणार ; बाबा धुमाळ यांनी घेतली भेट
पुणे : वारजे आणि परिसरात मुख्य एन डी ए रस्त्यावर आणि हायवे परिसर सर्व्हिस रस्त्यावर नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या भागातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी सोडवण्यासाठी संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घ्यावी व प्रलंबित कामांबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे.
अजित पवार यांनीही याबाबत लवकरच बैठक बोलावली जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता वारजे वाहतूक कोंडी प्रश्नात अजित पवार लक्ष घालणार हे निश्चित झाले असून हा वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बाबा धुमाळ यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत वारजे परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर चर्चा केली व येथील परिस्थितीची माहिती दिली. तसेच धुमाळ यांच्याकडून पवार यांना याबाबतचे पत्र ही देण्यात आले आहे.
देण्यात आलेल्या पत्रात खालील मुद्दे मांडण्यात आलेले आहेत.
वारजे परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. नागरिकांना ५ ते १० मिनटाच्या अंतरासाठी तासंतास एकाच जागेवर अडकून रहावे लागत आहे. यामध्ये एनडीए मुख्य रस्त्यावरील वारजे माळवाडी गणपती माथा टप्प्यात होणाऱ्या वाहतूक कोंडीत शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे व त्यापुढील अनेक गावे तसेच चांदणी चौक ते वारजे हायवे चौक वाहतूक कोंडीत कात्रज पर्यंत सर्व परिसरातील ये जा करणाऱ्या नागरिकांना अडकून राहावे लागत असल्याने फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रामुख्याने चांदणी चौक ते वारजे हायवे चौक व कात्रज हायवे लगत असलेले दोन्ही बाजूचे सर्व्हिस रस्त्यांवर ऑफिसला जाणारे नागरिक तासंतास एकाच जागी वाहतूक कोंडीत अडकून राहत आहेत. यात ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुलांची वाहने, कामगार वर्ग यांची मोठी कुचंबणा होत आहे.
वारजे येथून जाणाऱ्या नॅशनल हायवे वर सुद्धा रोज सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते त्यामुळे चांदणी चौकातुन येणारी वाहने हायवे वरुन न जाता सर्व्हिस रस्त्यावर उतरतात यामुळे सुद्धा सर्व्हिस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. याप्रमुख गोष्टींकडे धुमाळ यांनी लक्ष वेधले आहे.
याबाबत नॅशनल हायवेचे अधिकारी, वाहतूक अधिकारी, महापालिका आयुक्त व स्थानिक लोक प्रतिनीधी
यांच्या समवेत बैठक घ्यावी व वारजे डुक्कर खिंड ते जूना जकात नाका प्रलंबित असलेला २४ मीटर डीपी रस्त्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण झालेले आहे परंतु काही ठिकाणी वन विभाग व खाजगी जागा ताब्यात न मिळाल्यामुळे हा २४ मीटर डीपी रस्ता अर्धवट राहिलेला आहे. त्यामुळे या संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील सदर बैठकीत बोलावून डीपी रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच नागरिकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून हा २४ मीटर डीपी रस्ता व मुख्य एनडीए रस्ता व वारजे हायवे चौक दोन्ही सर्व्हिस रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत लवकर मार्ग काढण्याबाबत सूचना द्याव्यात अशी मागणी बाबा धुमाळ यांनी दिलेल्या पत्रात अजित पवार यांच्याकडे केली आहे.
पत्र दिल्यानंतर या प्रश्नी अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी योग्य उपाययोजना राबवण्यासाठी सकारात्मक दर्शवली असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.