पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या आयुक्तपदी वर्णी

पुणे : पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. राज्य शासनाने याबाबतचे आदेश काढले. तर, नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ता विभाग व्हीआयपी सुरक्षा विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी बदली करण्यात आली आहे.

कर्णिक यांच्या जागी पुण्याचे नवीन सह पोलीस आयुक्त म्हणून कोण येणार याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झालेली आहे. मात्र या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. एप्रिल २०२२ मध्ये संदीप कर्णिक पुण्याचे सह पोलीस आयुक्त म्हणून आले होते. तत्कालीन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची राज्य मानवी हक्क आयोग मुंबई या ठिकाणी बदली झाल्यानंतर कर्णिक यांची पुण्यामध्ये बदली झाली होती.



कर्णिक यांनी यापूर्वी पुणे ग्रामीणचे अधीक्षक म्हणून देखील काम केलेले आहे. तर, नाशिकचे विद्यमान पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस आयुक्त म्हणून काम केलेले आहे. मात्र शिंदे यांची कारकीर्द पूर्ण होण्याच्या आधीच त्यांची बदली करण्यात आलेली होती. आता कर्णिक यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर शिंदे यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे.






