किरण दगडे पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत भोर मतदार संघातून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

विकासाचा व हिंदुत्वाचा चेहरा म्हणून निवडणूक लढवणार : किरण दगडे पाटील
पुणे : भोर विधानसभा मतदार संघातून भाजपचे किरण दगडे पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. किरण दगडे पाटील भाजपकडून भोर मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते व अनेक वर्षांपासून ते तयारी करत होते, परंतु हा मतदार संघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)पक्षाला सोडण्यात आल्याने त्यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.
भोर विधानसभा मतदार संघ महायुतीच्या जागा वाटपात भाजप किंवा शिवसेनेला सुटेल अशी शक्यता होती. अर्ज भरायच्या एक दिवस आधी पर्यंत हा मतदार संघ कोणाकडे जाणार यावर तोडगा निघालेला नव्हता परंतु शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) या पक्षाला हा मतदार संघ सोडण्यात आला. या निर्णयामुळे भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
या मतदार संघातून भाजपचे किरण दगडे पाटील यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्याने त्यांनी मागे न हटता अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

किरण दगडे पाटील म्हणाले, मागील तीन वर्षात विविध उपक्रमांच्या माध्यमातून मी मतदारांपर्यंत पोहचलो आहे. काशी यात्रेच्या माध्यमातून मतदार संघातील हजारो नागरिकांना काशी विश्वनाथाचे दर्शन घडवले आहे तर दिवाळी सरंजाम च्या माध्यमातून ते मतदार संघातील घरोघरी पोहचलो आहे. महिलांसाठी सातत्याने उपक्रम राबवले आहेत. भोर मतदार संघाच्या विकासाची नवी दिशा ठरवली आहे. मतदार संघातील नागरिकांशी माझे जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे त्यामुळे विकासाचा आणि हिंदुत्वाचा चेहरा म्हणून भोर मतदार संघाची निवडणूक मी लढणार आणि जिंकणार आहे.
भोर मतदार संघात ज्या पद्धतीने किरण दगडे पाटील यांनी निवडणुकीची तयारी केली आहे त्यावरून महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे व किरण दगडे पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा सुरवातीपासून रंगली आहे.












