कोथरूड मृत्युंजय मंदिराशेजारील नाला बुजवून होणारा रस्ता नक्की कोणाच्या फायद्यासाठी ?

डीपी मधील रस्ते अपूर्ण असताना या रस्त्यासाठी एवढी घाई का.. अनेक प्रश्न होत आहेत उपस्थित..
कोथरूड : कोथरूड मधील कर्वे रस्त्यावरील मृत्युंजय मंदिराशेजारील नाला रस्त्यासाठी बुजविला जाणार असल्याने त्याला आता विरोध होताना दिसत आहे. मुळातच या नाल्या शेजारी गेल्या दोन वर्षात बांधकाम सुरू झाल्यापासून टप्याटप्याने घडलेल्या घडामोडींबाबत त्या त्या वेळी संशय व्यक्त केला गेला होता. सध्या येथील रस्त्यासाठी नाला बुजवला जात असल्याने त्याची चर्चा कोथरूड मध्ये जोरदार सुरू आहे. नाला बुजवून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या मागे वेगळेच राजकारण घडत असल्याचे बोलले जात आहे.
साधारण २०१० मध्ये पावसातील पाण्यामुळे कोथरूड मध्ये पुर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी कोथरूड मधील बुजवण्यात आलेल्या नाल्यांचा प्रश्न एरणीवर आला होता. आता पुन्हा नाला बुजवला जात असल्याच्या चर्चेने जुन्या घटनांना उजाळा मिळत आहे. मागील पावसाळ्यात आंबील ओढ्याचा प्रश्न पुढे आला होता या ओढ्याला आलेल्या पुरामुळे हाहाकार माजला होता त्याचीच पुनरावृत्ती कोथरूड मध्ये प्रशासनाला करायची आहे का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

कर्वे रस्त्यावरील मृत्युंजय मंदिराशेजारील नाला मोठा आहे. या नाल्याला लागून काही महिन्यांपूर्वी बांधकाम सुरू झाले बांधकाम सुरू झाल्यानंतर काहीच दिवसात नाल्याला लागून असलेली भिंत पडली त्यावेळी ही भिंत पाडल्याचा आरोप झाला होता, त्यामुळे ही भिंत पडली का पाडली हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्यानंतर येथील झाडे काढली गेली त्यावर त्याला परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी नाल्याच्या कडेची कोणाला अडथळा नसलेली झाडे का काढली गेली असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता हा नाला बुजवून त्यावर रस्ता केला जाणार आहे त्यामुळे या नाल्याच्या बाबतीत सध्या काय सुरू आहे असं म्हणावे लागणार आहे. नाल्याच्या कडेने आता हिरव कापड लावण्यात आलेल आहे, त्यामुळे नक्की आत काय सुरू आहे हे कोणाला कळत नाही. एवढ लपून छपून रस्त्याचं काम का केलं जातं आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.



या नाल्यावर रस्ता होत असल्याने तो डी पी मधील रस्ता असण्याची शक्यता नाही. कोथरूड भागातील डी पी मधील अनेक रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत. मग याच रस्त्यासाठी एवढी घाई का ? हा रस्ता नक्की कोणाच्या फायद्यासाठी होतोय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या रस्त्याचे काम केले जात आहे. महापालिकेच्या हद्दीत सार्वजनिक बांधकाम खात्याने एवढया लगबगीने नाल्यावर रस्ता करण्याचे हाती घेतलेले काम शंका निर्माण करत आहे. या रस्त्याचे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम खात्याने पुणे महापालिकेची परवानगी घेतली आहे का हेही आता विचारले जात आहे. एवढया वर्षांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला हा रस्ता करण्यासंदर्भात जाग कशी आली. लोकप्रतिनिधींना याआधी हा रस्ता व्हावा असं का वाटलं नाही याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.



सध्या मृत्युंजय मंदिराशेजारी मोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत त्यांच्या फायद्यासाठी हा रस्ता केला जातोय का ? यात कोणाचे हितसंबंध जोपासले जात आहेत का याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत असल्याने त्याची सोडवणूक प्रशासन करणार का हे आता पहावे लागणार आहे. याला काही राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे या नाल्याचे भवितव्य काय आणि नाल्यावर रस्ता झालाच आणि भविष्यात त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला जबाबदार पालिका प्रशासन राहणार का हे ही अधिकाऱ्यांनी स्पष्ट करणे गरजेचे आहे.


