उत्तरप्रदेशात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

लखनौ- उत्तरप्रदेशात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील ५९ विधानसभा जागांवर एकूण ६३४ उमेदवार रिंगणात आहेत. पिलीभीत, लखीमपूर खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनऊ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर जिल्ह्यातील ५९ विधानसभा मतदारसंघातील मतदार आज मतदान करणार आहेत.
२०१७च्या निवडणुकीत भाजपाने आज मतदान होत असलेल्या ५९ पैकी ५१ मतदारसंघ जिंकले होते. त्यावेळी समाजवादी पक्षाला चार तर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला तीन जागा मिळाल्या होत्या. आज मतदान होणार्या जिल्ह्यांपैकी लखीमपूर खेरी, पिलीभीत, रायबरेली, लखनऊ या जिल्ह्यातील मतदारसंघ फार महत्वाचे मानले जातात.
काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा रायबरेलीत या टप्प्यात मतदान होतंय. इथून काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या अदिती सिंह भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर सरोजिनी नगर मतदारसंघात भाजपचे माजी ईडी अधिकारी राजेश्वर सिंह आणि समाजवादी पक्षाच्या सरकारमधील माजी मंत्री अभिषेक मिश्रा यांच्यात लढत होणार आहे. लोकांनी मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन अदिती सिंह यांनी केले. तसेच काँग्रेस या निवडणुकीत शर्यतीतच नसल्याचंही त्या म्हणाल्या.
उन्नावमध्येही मतदान सुरू झाले असून नागरिक मतदानासाठी केंद्रांवर पोहचू लागले आहेत.बसपाच्या मायावतींनी लखनऊमधील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.




