कोथरुड

कोथरुड मधील २ लाख ३६ हजार नागरिकांची होणार तपासणी

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” अभियानाचा शुभारंभ

कोथरुड : कोविड – १९ चा प्रसार व प्रादुर्भाव कमी करण्यासाठी “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” अभियाना अंतर्गत कोथरुड  बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग १०, ११ व १२ मधील  २ लाख ३६ हजार नागरिकांच्या आरोग्याची तपासणी १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहे. यासाठी टीम तयार करण्यात आल्या असून  प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची सर्दी, खोकला व ताप तसेच ऑक्सिमिटरने ऑक्सिजनची तपासणी करण्यात येणार आहे.

कोथरुड मधील “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या अभियानाचा शुभारंभ महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी  महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांच्याकडून वरील माहिती देण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी वाढत्या कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या मोहिमेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

हे अभियान गतीमान करण्यासाठी त्याला स्पर्धात्मक रुप देण्यात आले आहे. यानुसार पुणे महानगरपालिकेच्या पंधरा क्षेत्रिय कार्यालयापैकी कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाने  सदरचे अभियान अधिक गतीमान करण्यासाठी पाऊल उचलले आहे.  सदर अभियान यशस्वी करण्यासाठी महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १०,११,१२ या तीनही प्रभागात कनिष्ठ अभियंता स्वप्निल खोत, अनंत ठोक व नरेंद्र परदेशी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ आरोग्य निरिक्षक  राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली  पीएमपीएमएल व शिक्षण विभाग व आरोग्य निरिक्षक, मोकादम काम करणार आहेत.  या सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” हे अभियान यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

या अभियानासाठी दोन सदस्यांची एक टिम अशा एकूण ४७ टिम तयार करण्यात आल्या आहेत. या टिमवर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वयक म्हणून नागेश गायकवाड व कैलास डोंगरे यांची नेमणूक केली आहे. तसेच यावर एकूण सहा  सुपरवायझरच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.

यावेळी पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते सर्व टिमला मास्क, सॅनिट्रायझर बाटल्या, हात  धुवायला मोती साबण व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन हे अभियान यशस्वी करावे असा सल्ला सुतार यांनी कर्मचाऱ्यांना दिला. या अभियानामुळे कोरोना आटोक्यात येण्यास मदत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ आरोग्य निरिक्षक मा. राम सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमास अभियंता प्रफुल्ल कुलकर्णी, डाॅ. महेश साबळे सर्व आरोग्य निरिक्षक व इतर सर्व महिला व पुरूष कर्मचारी उपस्थित होते. तसेच समारोप लक्ष्मण काळे यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये