HSC Exam Hall Ticket 2022 : बारावीचे ऑनलाइन हॉलतिकीट उद्यापासून उपलब्ध

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या मार्च- एप्रिल 2022 परीक्षेचे ऑनलाइन हॉलतिकीट सर्व विद्यार्थ्यांना 9 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी एक वाजल्यापासून कॉलेज लॉगइनमध्ये उपलब्ध होणार आहे.
महाविद्यालयांनी हॉलतिकीट डाऊनलोड करून प्रिंट घेऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीत होणार आहे तर लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

हॉलतिकीट www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉगइनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण आल्यास विभागीय मंडळाशी संपर्क साधायचा आहे. हॉलतिकीट देण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यायची आहे.
प्रवेश पत्रात विषय व माध्यमात बदल झालेला असल्यास ती चूक महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन दुरुस्त करून घ्यायची आहे. मात्र, फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव यासंदर्भातील दुरुस्ती कॉलेजांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. विद्यार्थ्याचा फोटो सदोष असल्यात त्यावर विद्यार्थ्याचा योग्य फोटो चिकटवून संबंधित प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे.



