कर्वेनगरमधील डीपी रस्ता परिसरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजनेकरिता नगरसेवक स्वप्नील दुधाने यांचे महत्वपूर्ण पाऊल

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत पोलिस चौकी करण्याची केली मागणी..
कर्वेनगर : कर्वेनगर मधील नदी पात्रालगत असणाऱ्या १२० फुटी डीपी रस्त्यावर राजाराम पूल ते दुधाने लॉन्स परिसरात वाढलेली लोकवस्ती, व्यायामासाठी येणारे नागरिक आणि या रस्त्यावर असणारा तरुण तरुणींचा वावर या सर्वांचा विचार करता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी नगरसेवक स्वप्नील दुधाने यांनी पुणे पोलिस आयुक्तांकडे महत्वाची मागणी केली आहे.
कर्वेनगर हद्दीमधील नदी पात्रालगत असणाऱ्या १२० फुटी डीपी रस्ता परिसरात पोलीस चौकी करण्याची मागणी स्वप्नील दुधाने यांनी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे. दुधाने यांनी अमितेश कुमार यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली असून पोलीस चौकीच्या मागणीच्या संदर्भातील निवेदन त्यांना दिले आहे. या भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वप्नील दुधाने यांनी घेतलेली भूमिका आणि केलेली मागणी म्हणजे एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या परिसरात पोलीस चौकी झाल्यानंतर या भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

नगरसेवक स्वप्नील दुधाने म्हणाले, या परिसरात लोकवस्ती वाढत असून परिसराचा विकास झपाट्याने होत आहे. यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था राखणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. या परिसरापासून पोलीस चौकी जवळ नसल्याचा फटका नागरिकांना बसत आहे. आपत्कालीन परिस्थिती आली असता ज्येष्ठ नागरिक, स्त्री वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असून नियमित गस्त आणि तक्रारीवर उपाययोजना करण्यामध्ये पोलीस बांधवांवरही तणाव दिसून येतो.
यावर उपाययोजना म्हणून सदर परिसरात नव्याने पोलीस चौकी उभारण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आज पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कार्यवाही करण्याचा शब्द दिला असल्याचे दुधाने यांनी सांगितले.






