कोथरुडमध्ये ७० फुट उंचावर मांजाला अडकलेल्या कबुतराची मनपा कर्मचार्याने केली अशी सुटका…

कोथरूड : पतंगाच्या मांजाला अडकून पक्षी दगावल्याच्या घटना अनेक वेळा घडल्याचे आपण पाहिले आहे. तसाच प्रकार कोथरूडमधील डहाणूकर कॉलनी मध्ये घडला पण, महिला नागरिकाच्या सतर्कतेमुळे व पालिका कर्मचारी व पेपर विक्रेत्याच्या प्रयत्नामुळे ७० फूट उंचावर मांजात अडकून बसलेल्या कबुतराला जीवनदान मिळाले.
डहाणूकर कॉलनीमध्ये राहाणार्या कर्तव्यदक्ष माहिला नागरिक सुजाता शर्मा यांचे सकाळी फिरायला जात असताना मांजाला अडकलेल्या जिवाच्या आकांताने तडफडत असलेल्या कबुतराकडे लक्ष गेले. सदर कबुतराचे प्राण वाचवण्यासाठी शर्मा यांनी महानगरपालिकेचे मोकादम वैजीनाथ गायकवाड यांना त्वरित फोन करून मांजाला कबुतर अडकल्याची माहिती दिली. वैजीनाथ गायकवाड हे वर्तमानपत्र विक्रेते संजय उभे यांना बरोबर घेऊन त्वरित घटनास्थळी पोहचले.

मांजाला अडकलेले कबुतर ७० फुट उंचावर तडफडत होते त्यामुळे प्रसंगावधान राखून पक्षी मित्राला व अग्निशामक केंद्रावर फोन करून माहिती दिली. पक्षी मित्राची व अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत कबुतराची सुटका करता येईल का याचा विचार करून वैजीनाथ गायकवाड व संजय उभे यांनी कृतिका सोसायटीचे वॉचमन यांना टेरेसचे कुलूप उघडण्यास सांगितले. स्वतः या दोघांनी १५ फूट लांब बांबूच्या टोकाला तारेची आकडी करून बांधली. टेरेसवर जावून बांबूच्या साह्याने कबूतर अडकलेल्या मांजाला सावकाश ओढून घेण्यात आले. बांबू ओढत असताना हाताच्या जवळ आलेल्या कबुतराने अडकलेल्या पंखाची सुटका करून घेतली. अग्निशमन दलाची गाडी येण्याच्या आधी सदर कबुतराची सुटका करून प्राण वाचवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते बाळू दांडेकर, व्यापारी संघाचे शशीकांत उभे यांनी वैजीनाथ गायकवाड व संजय उभे यांचे कौतुक केले.






