सुप्रिया तू बोलू नको ..; कालानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात : अजित पवार यांचा वेगळा सुर

मुंबई : भावनिक होवून चालणार नाही. कालानुरूप काही निर्णय घेतले जातात. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष झाला तर त्याला पवार साहेबांकडून अनेक बाबी शिकायला मिळतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तेच तेच बोलू नये, अशा शब्दात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. मात्र, कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम असून शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून पायउतार होवू नये, असे विणवत आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विनंती केली असता ‘ सुप्रिया तू बोलू नको ….’ असे अजित पवार यांनी सुचविले.
कार्यकर्त्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले, तुम्ही किमान पवार साहेबांना निर्णय मागे घेण्याची मागणी करू शकता, मात्र मी किंवा सुप्रिया ते पण बोलू शकत नाही. पवार साहेबांच्या वयाचा विचार करता त्यांनी हा निर्णय घेतला असावा. ते अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार, याचा अर्थ ते पक्षात राहणार नाहीत असे नाही. पक्ष त्यांच्या मार्गदर्शनातूनच चालणार आहे. साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष झाला तर त्याला पवार साहेबांकडून अनेक बाबी शिकायला मिळतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तेच तेच बोलू नये.
या सर्व गदारोळात जवळपास दुपारचे सव्वादोन वाजले होते. पवार साहेबांचे जेवणाची वेळ झाली. तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याची आणि वेळ देण्याची विनंती केली. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पवार साहेबांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे खासदार प्रफुल्ल पटेलही कार्यकर्त्यांवर चिडले.




