उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला अपघात

मुंबई : महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या बोटीला मांडवा येथे समुद्रात अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मांडव्याजवळ उदय सामंत यांची बोट जेट्टीला धडकल्याने हा अपघात घडला आहे. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या अपघाताची माहिती प्रशासनाकडून मात्र अद्यापर्यंत जारी करण्यात आलेली नाही. उदय सामंत अलिबाग दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते अलिबाग च्या दिशेने जात होते. तेथे पार्किंगमध्ये बोट पिलर ला धडकल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नसून उदय सामंत ही सुखरूप आहेत. या बोटीमध्ये उदय सामंत यांच्याबरोबर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती हे देखील होते.
अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजन संदर्भातील आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला हे दोघेजण मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथून स्पीड बोट ने अलिबाग येथे आले होते. बोट मांडवा जवळ आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोट जेट्टीच्या खालच्या पिलरला जाऊन धडकली मोठीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट किनाऱ्याला लावली




