व्रत करायला मी वेडी नाही; रत्ना पाठक यांचे वक्तव्य

मुंबई : अभिनेत्री रत्ना पाठक यांनी करावचौथ व्रत करायला मी वेडी नाही. सुशिक्षित महिलादेखील पतीच्या दिर्घायुष्यासाठी असले व्रत करतात ही खुप आश्चर्याची गोष्ट आहे. खरं तर भारतात एका विधवेला भयाण आयुष्य जगावं लागतं आणि याच भितीपोटी महिला असले व्रत करतात, असं मत व्यक्त केलं आहे. कधी पतीच्या दिर्घायुष्यासाठी एखादं व्रत किंवा उपवास केलाय का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. एकविसाव्या शतकात आपण असल्या गोष्टी करतो हे खरचं दूर्दैव असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
आपले विचार मोकळेपणाने मांडत असताना रत्ना पाठक पुढे म्हणाल्या, “आपण अत्यंत पुराणमतवादी आणि रुढीवादी समाजाकडे वाटचाल करत आहोत. इथं महिलांवर कायम ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. जगातील कोणत्याही पुराणमतवादी समाजाकडे पाहा, सगळीकडे प्रथम महिलांवर ताशेरे ओढले जातात. सौदी अरेबियाकडेच बघा ना, आपण त्याच दिशेने वाटचाल करत आहोत.”असं म्हणत रत्ना पाठक यांनी महिलांच्या वाट्याला येणाऱ्या जाचक रुढी परंपरांवर आपलं मत मांडलं.




