राजकीय

”ठाकरे व शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा”; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

मुंबई : ठाकरे व शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा. जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं? झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, पण तुम्ही झाडाची मुळं नेऊ शकत नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत बंडखोरांवर घणाघाती हल्ला केला.

मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले, तर काहींनी मी बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? 

मला सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो, कोण कसं वागलं यात जायचं नाही, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं पाप, माझं मुख्यमंत्रीपद मान्य नसणं राक्षसी महत्त्वकांक्षा, एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? नगरविकास खातं दिलं, माझ्याकडील दोन खाती शिंदेंना दिली, याचा उल्लेखही ठाकरेंनी केला.

हे सारं भाजपनं केलं

“बाहेरच्या भाडोत्री लोकांकडून आपल्यात वाद निर्माण करण्याचं काम करण्यात येतंय, हे सारं भाजपने केलं, त्यांची आग्र्याहून सुटका करावी लागेल. करोनाचं संकट गेल्या दोन वर्षांपासून मागे लागलं आहे. करोनाचा त्रास संपत असतानाच मानेचा त्रास सुरु झाला आहे. कोणती व्यक्ती कोणत्या वेळी आपल्याशी कशी वागली हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

“मी त्या दिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करणार आहे. मी वर्षा सोडली म्हणजे मोह, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातही या पदावर जाईन असा विचार केला नव्हता. त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मानेची शस्त्रक्रिया केली तेव्हा मोदींनीही मला फार हिंमतीचं काम केलं असं सांगितलं होतं. त्यावेळी मी हिंमत माझ्या रक्तात आहे सांगितलं होतं,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “पहिलं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवस ठीक होतं. पण एक दिवस उठल्यानंतर शरिरातील काही भागांच्या हालचाली होत नसल्याचं लक्षात आलं. त्यानंतर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आदित्य ठाकरे परदेशात होते”.

शब्द देऊनही निघून गेले

उद्धव ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदेंसोबत आमदार गुजरातला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर काही आमदारांना निवासस्थानी बोलावलं होतं अशी माहिती दिली. यावेळी त्यांनी काही झालं तरी सोडून जाणार नाही सांगितलं होतं. पण त्यावेळी उपस्थित असणारे दादा भूसे, संजय राठोड शब्द देऊनही निघून गेले. अशा लोकांचं करायचं काय? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी करत वाईट वाटत असल्याचंही नमूद केलं.

“काही आमदार तिकीट कापलं तरी जाणार नाही असं म्हणाले होते. पण आता गेले आहेत तर जाऊ द्या. निधी मिळाला नाही म्हणून अनेकांनी तक्रारी केल्या. मी तर सर्व पातळीवर निधी वाटपाचं काम करत आलो आहे. शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन वेळा शिवसेना सत्तेत आली आणि दोन्ही वेळा मी त्यांना महत्वाची पदं दिली,” असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख न करता केला.

“तुम्हाला हवे आहेत तितके आमदार घेऊन जा. पण जोपर्यंत बाळासाहेबांनी रुजववेली मूळं आहेत तोवर शिवसेना संपणार नाही. जे सोडून गेलेत ते माझे कधीच नव्हते. मूळ शिवसेना माझ्यासोबत आहे. ज्यांना आपण मोठं केलं त्यांची स्वप्नं मोठी झाली, ती मी पूर्ण करु शकत नाही. त्यांनी जावं, बाळासाहेबांनी आम्हाला हे शिकवलेलं नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपसोबत जावं यासाठी दबाव 

ठाकरे म्हणाले की, “भाजपसोबत जावं यासाठी माझ्यावर काही आमदारांचा दबाव आहे. माझ्या कुटुंबावर, मातोश्रीवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. मी शांत आहे षंढ नाही”.

“आपण प्रत्येक वेळी त्यांना महत्वाची खातं दिली. नगरविकास नेहमी मुख्यमंत्र्यांकडे असतं, पण त्यांना दिलं. संजय राठोड यांचं वनखातं माझ्याकडे घेतलं. साधी खाती मी माझ्याकडे ठेवली. मला आता या सगळ्या आरोपांचा वीट आला आहे. ही वीट ठेवून चालणार नाही, तर अशा लोकांच्या डोक्यावर हाणणार आहे. स्वत:चा मुलगा खासदार आणि माझ्या मुलाने काही करायचं नाही का?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये