राजकीय

आता राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना सांगणार तरी कोण ?

अमोल साबळे

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकमेकांमध्ये सोशल डिस्टंसिंग ठेवा असे शासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. राजकीय नेतेही याबाबत सूचना करत असतात परंतु अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये,  आंदोलनांमध्ये सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना सांगणार तरी कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात सध्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी, राजकीय पक्ष संघटना यांची आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय कार्यकर्ते, संघटनांचे सदस्य  एकत्र येताना दिसत आहेत. शहरात होत असलेल्या बऱ्यापैकी आंदोलनांचे फोटो पाहिले तर सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळला जात नसल्याचं समोर येत आहे. आंदोलनांमधील बऱ्याच जणांकडून मास्कचा वापर ही व्यवस्थित केला जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकारांमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Img 20201011 wa0011

राजकीय नेते मंडळीच जर असे वागत असतील तर सर्वसामान्य लोकांनी कोणाचा आदर्श घ्यायचा. हेच सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळा म्हणतात आणि तेच नियम पायदळी तुडवतात – राजीव फुलमामडीकर(नागरिक)

शहरात सध्या राजकीय पक्षांकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्रे देण्याचे कार्यक्रम पार पाडत आहेत. काही कार्यक्रम वगळता त्यातही सोशल डिस्टंसिंग पाळले जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, महापालिका पातळीवर वेळोवेळी केल्या जाणाऱ्या सूचनांकडे राजकीय नेते, कार्यकर्त्यांकडूनच सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे पाहिला मिळत आहे. वरिष्ठ नेत्यांनी याबाबतीत जागरूक असणे आवश्यक आहे.

सध्या जरी कोरोना संसर्ग कमी होताना दिसत असला तरी तो पूर्ण कमी झालेला नाही. पुन्हा तो वाढण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. कार्यक्रम घ्या, आंदोलने करा पण हे करत असताना कोरोना संसर्गाचा फैलाव तर होणार नाहीना याची काळजी घ्या.  शासनाकडून दिल्या जाणाऱ्या नियमांचे पालन सर्वांकडूनच होणे आवश्यक आहे आणि हे पालन झाले तरच कोरोना हद्दपार होणार आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये