महिला कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरण, भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर पॉक्सोसह आणखी एका कलमांतर्गत गुन्हा दाखल

नवी दिल्ली : महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषण प्रकरणात दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार व भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पॉक्सो कलमाअंतर्गत एका गुन्हाचा समावेश आहे. दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गुन्हा दाखल करण्यासाठी महिला कुस्तीगिरांना सर्वोच्च न्यायालयात घ्यावी लागली धाव
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगिरांच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी २१ एप्रिलला ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण, पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने रविवारपासून ( २३ एप्रिल ) आघाडीचे कुस्तीगीर पुन्हा जंतर-मंतर मैदानावर आंदोलन बसले आहेत. तसेच, सोमवारी ( २४ एप्रिल ) कुस्तीगीर विनेश फोगाटसह अन्य ६ जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत ब्रिजभूषण सिंहविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत याचिका दाखल केली होती.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायाधीश पी.एस नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा “दिल्ली पोलिसांकडून आजच ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल,” अशी माहिती महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली होती. त्यानुसार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात अल्पवयीन महिला कुस्तीगीरचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पॉक्सो कलमाअंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, अन्य महिला कुस्तीगीरांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.






